मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होताना दिसतोय. त्यातही मुंबईतलं हॉटस्पॉट ठरलीय ती धारावी झोपडपट्टी.

आशिया खंडातल्या सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक, अशी धारावीची ओळख आहे. दाटीवाटीच्या या वस्तीत लाखो लोक राहतात. इथं छोटे-मोठे कारखाने आहेत. चिंचोळ्या गल्ल्या आहेत. एका खोलीत अवघा संसार मांडलेले अनेक कुटुंबं आहेत.

अशा सगळ्या स्थितीत कोरोना व्हायरससाठीच्या खबरदाऱ्या कशा घ्यायच्या, हा प्रश्न इथल्या अनेकांना भेडसावतोय.

'धारावी' नामक या जगाचा धांडोळा या फोटोंमधून घेऊया...

धारावीच्या लहान खोलीवजा घरांमध्ये रमजान महिन्यात रोजा सोडणारं मुस्लीम कुटुंब. एरव्ही सामूहिकपणे नमाज पढणं आणि इफ्तारसाठी एकत्र जमणं, या सालाबादप्रमाणे चालत आलेल्या परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोडाव्या लागल्या आहेत.

धारावीत स्थलांतरित कामगार छोट्या-छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात. अनेकदा त्यांचं वास्तव्य कामाच्याच ठिकाणी असतं. अशाच एका कारखान्यात रोजा सोडणारे कामगार.

धारावीत घर कुठे सुरू होतं आणि पोटापाण्याचा व्यवसाय कुठे सुरू होतो, हे वेगवेगळं काढता येणार नाही, अशा अडचणीच्या जागेत लोकांचे व्यवहार सुरू असतात.

दोन पावलांवर दुसऱ्या घराचा उंबरठा लागतो आणि शिडी गाठली की आणखी एक घर. या झोपडपट्टीत एका चौकोनात अनेक कुटुंबांच्या चौकटी दिसतात.

घर म्हणजे एक खोली. एका खोलीतच संसार मांडलेलं छोटेखानी कुटुंब.

सोशल डिस्टन्सिंगमध्ये प्रत्येकाने दीड मीटर अंतर कसं पाळायचं? आणि क्वारंटाईंन व्हायचं झाल्यास काय करायचं?

धारावीसारख्या झोपडपट्टीत घराची व्याख्या नेमकी कशी करणार? कारण घर म्हणजे उंबरठ्याबाहेरची बसायची जागादेखील आहे.

चिंचोळ्या आणि अंधाऱ्या गल्ल्यांची धारावी.

महानगराच्या वेशीवर असलेल्या 'मिनी इंडिया' धारावीच्या खिडक्या...

रात्रंदिवस जागणारी धारावी कोरोनाच्या उद्रेकामुळे आणखीच हतबल झाली आहे.

विविध जाती-धर्माचे लोक इथं एकत्र नांदतात...

धारावीच्या 90 फिट रोडवर रात्री अशी गर्दी असते. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना घरातून मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही.

क्वारंटाईन म्हणजेच विलगीकरण करण्यासाठी काही ठिकाणी हे असे बॅरिकेड्स लावले गेले आहेत.

दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडल्यानंतरची ही परिस्थिती.

सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन आणि कंटेनमेंट झोन या गोष्टी धारावीच्या झोपडपट्टीत कशा शक्य आहेत? असा प्रश्न धारावीत राहणाऱ्यांना पडलाय.

https://www.youtube.com/watch?v=5cQ0to1cz1g

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)