पायात 36 भारांची चांदीची जोडवी, नऊवार साडी, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर पडत चालेल्या सुरकुत्या पण तरीही खणखणीत आवाजात कृष्णाबाई देवडकर म्हणाल्या, 'इकडं या मी तुम्हाला पुरात पडलेली घरं दाखवते.'

त्यांनी आम्हाला संपूर्ण आंबेवाडी गाव दाखवलं.

कोल्हापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरानंतर आता ऑक्टोबरमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी आम्ही आंबेवाडीत गेलो होतो.

मुख्य शहरापासून साधारण 10 ते 15 किलोमीटरवर असलेलं हे गाव तसं शहरातल्या एखाद्या कॉलनी सारखं वाटत होतं. सर्व पक्की घरं. एखाद दुसरं मातीचं किंवा जुन्या पद्धतीनं मोठे लाकडी वासे लावून उभारलेलं टूमदार घर.

पुरात सर्वांचच मोठं नुकसान झालंय. अनेक घरांमध्ये टीव्ही, फ्रीजसारख्या गरजेच्या वस्तुंचं नुकसान झालंय.

पण सर्वांत जास्त नुकसान झालंय ते जुन्या आणि कच्च्या घरांचं. गावातल्या गणेश कॉलनीमध्ये फिरताना कृष्णाबाईंनी आम्हाला त्यांच्या पडक्या घराकडे नेलं.

त्यांचं घर जुन्या पद्धतीचं लाकूड, विटा आणि मातीचं होतं. पण पुरानंतर मात्र आता तिथं फक्त लाकडं आणि मातीचा ढीग उरला होता.

"यंदा मी काही मतदानच करणार नाही, मला काही कुणाला मतच द्यायचं नाही, कुणाची मदत सुद्धा नको. आम्ही काम करून उभारू सगळं," मतदान कुणाला करणार असं विचारल्यावर कृष्णाबाई सांगू लागल्या.

दुधाचा व्यवसाय आणि वाट्यानं करायला घेतलेल्या ऊस शेतीवर त्यांचं कुटुंब चालतं.

पण पुरामुळे त्यांची जनावरं आजारी पडली आहेत, गायीचं दूध कमी झालं आहे. तर दुसऱ्याकडून करायला घेतलेल्या 2 एकर शेतातला ऊस सडून गेला आहे.

सुरुवातीला मदत मिळाली पण...

स्थानिक पुढाऱ्यांनी पुराच्या वेळेला अन्नपाणी औषध आणून दिलं पण त्यानंतर मात्र कुणी आलं नाही, असं गावकरी सांगतात.

नंदा चौगुलेंनी त्यांचं नवंच घर बांधलंय. पण पुरामुळे एका बाजूला झुकलेल्या त्यांच्या घराला आता त्यांना लाकडानं टेकू देण्याची वेळ आली आहे.

"घरात कमावणारा एकच मुलगा आहे, खाणारी माणसं 6 आहेत, आता जमेल तसं आम्ही घर दुरूस्त करू," नंदा सांगत होत्या.

मदतीचं आश्वासन देणाऱ्यालाच मत...

फक्त मातीच्याच घराचं नुकसान झालंय असं नाही. सिमेंटनं बांधलेल्या घरांचं पण पाण्यामुळे नुकसान झालं आहे. बाटल्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या शोभा भोईंगडे यांचं घर सिमेंटचं होतं पण त्यांच्या घराचंही नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बाहेरून सुस्थितीत दिसत असेलेलं घर आतून पूर्णपणे जीर्ण झालं होतं. पाण्यामुळे आतल्या भिंती पडल्या होत्या, त्यामुळे आतून सर्वत्र लोडबेरिंग लावून वरचा स्लॅब कोसळू नये म्हणून तात्पुर्ती व्यवस्था करण्यात आली होती.

शोभा यांच्या कुटुंबीयांनी कर्ज काढून हे घरं बांधलं पण पुरामुळे त्याला पोहोचलेल्या इजेमुळे ते कधी पडेल सांगता येत नाही.

पाणी गावात शिरण्याच्या दिशेला अगदी पहिलंच घर शोभा यांचं आहे, त्यामुळे त्यांच्या पक्क्या घराचं एवढं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मदतीचं आश्वासन देणाऱ्याला आम्ही मतदान देऊ असं त्याचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

https://www.youtube.com/watch?v=skDMHuJaY3A

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)